रत्नागिरी : प्रवासी घेऊन जाणारी एसटी थांबवून तिकीट तपासनिसाने गाडीत शिरून तपासणी सुरू केली. एका प्रवाशाकडून जबरदस्तीने खोटा जबाब लिहून घेतला. शिवाय दमदाटी करून वाहकावर खोटा आळ घेण्यात आला आहे, अशी माहिती पुढे आली आहे. तिकीट तपासनीसांच्या उद्दामगिरीबाबत प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.दि.२९ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वा. चिपळूण बसस्थानकातून सुटलेली रत्नागिरी (एमएच२० बीएल १७१९) गाडी संगमेश्वर एस.टी स्टँडवर थांबविण्यात आली. (एमएच ०६ एडब्लू ४३१७) या गाडीतून वाहन तपासनीस एसटीमध्ये शिरले. एक सिव्हील ड्रेसमध्ये तर दोन गणवेषात होते. त्यांनी तपासनीसांनी वाहकाकडील मशीन तपासले. त्यानंतर त्यांनी वाहनातील सर्व प्रवाशांकडील तिकिटे तपासली.काही वेळानंतर तपासनीसांनी एका प्रवाशाला वाहकास १०० रूपये दिल्यावर त्याने अन्य पैसे न दिल्याचे सांगण्याची सूचना केली. मात्र त्या प्रवाशाने ही बाब नाकारत खोटे बोलण्यास नकार दिला. त्यावर ‘तुम्ही बाकी काहीही करू नका, केवळ सही द्या, असे त्या तपासनीसांनी प्रवाशांना सांगितले. प्रवाशाने नकार देऊनही जबरदस्तीने संबंधित प्रवाशाकडून खोटा जबाब लिहून घेतला. शिवाय संबंधित प्रवाशाकडील तिकिटे काढून घेतली.संबंधित प्रकार सुरू असेपर्यत एसटी थांबवून ठेवण्यात आली होती. प्रवाशांनी गणेशोत्सव आहे, अशी ओरड करताच एसटी मार्गस्थ झाली. परंतु तपासनीसांच्या उद्दामपणाबद्दल प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली. काही वेळाने ‘आम्ही सातारकर आहोत, पाहून घेऊ..’ धमकी देत संबंधित अधिकारी निघून गेले.तिकीट तपासणीकांनी चालत्या गाडीत तपासणी करणे आवश्यक आहे. शिवाय प्रवाशांकडून जबरदस्तीने खोटा जबाब लिहून घेवून वाहकास नाहक त्रास देणे, किंवा त्यांच्या नोकरीवर गंडांतर आणू पाहणाऱ्या उद्दाम तिकीट तपासणीसाचा राज्य परिवहन महामंडळाने शोध घ्यावा. महामंडळाने तपासणीस खरे होते की, खोटे याची खात्री करून वाहकास त्रास देणाऱ्या व प्रवाशांना जेरीस आणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशीवर्गाकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
एसटी प्रवाशाकडून घेतला खोटा जबाब
By admin | Published: September 03, 2014 11:25 PM