चिपळूण : महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्य संपूर्ण देशात सहकार क्षेत्रात लौकिक मिळविलेली राज्य आहे. या राज्यात ५० टक्के संस्था असून देशाच्या अन्य राज्यातही ५० टक्के संस्था उभ्या आहेत. सहकार चळवळ ही १८९० सालापासून सुरु झाली. यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील या महत्त्वाच्या व्यक्तींनी सहकार चळवळ सुरु करुन मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.शहरातील पवन तलाव मैदानावर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव समारोपीय सोहळा, ध्यासपर्व पुस्तकाचे प्रकाशन आणि सहकार भवन वास्तु उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार नारायण राणे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे, संस्थेचे अध्यक्षव संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, स्मिता चव्हाण, आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत खेतले, अशोक कदम व संचालक मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहकार भवनाचे उद्घाटन माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार म्हणाले की, कोकणातील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने लोकांच्या विश्वासर्हतेवर वाटचाल केली असून या संस्थेचे माजी केंद्रीय कृषीमंत्री पवार यांनी कौतुक केले.या कार्यक्रमात सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, कोकणाला निसर्गाने भरभरुन दिले आहे. कोकणात सहकारी पर्यटन संस्था उभ्या केल्यास कोकण समृध्द होवू शकतो. सर्वांच्या योगदानाने व संचालक मंडळाने केलेल्या पारदर्शक कारभारामुळे ही पतसंस्था नावारुपाला आलेली आहे, असे सांगितले.माजी जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शेती व शेतीला पूरक व्यवसाय याशिवाय राज्याचा विकास होवू शकत नाही. या संस्थेने कोकणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात जावून धाडस करुन संस्थेने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. गेल्या २५ वर्षात या संस्थेने पारदर्शक व्यवहार व विश्वासार्हता निर्माण केली आहे. उद्याचा कोकण सहकाराच्या माध्यमातून घडवायचा आहे.
चिपळुणात अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले. त्यावेळी चिपळूणच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमालादेखील चिपळूणच्या नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून चिपळुणातील नागरिक साहित्य, कला, क्रीडा व सहकार यावर प्रेम करणारे आहेत. असा विश्वास व्यक्त केला.