आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी , दि. १५ : जिल्हा नियोजन समितीच्या २४ पदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठीची अंतिम मतदार यादी शुक्रवार, दि. १४ जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालय, सर्व मुख्याधिकारी (नगर परिषद), सर्व मुख्याधिकारी (नगरपंचायत) तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे
महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (निवडणूक) नियम १९९९ अन्वये येथील जिल्हा नियोजन समितीच्या २४ पदांसाठी निवडणूक होणार आहे. त्याकरिता जिल्हा परिषद ग्रामीण क्षेत्र मतदारसंघ, नगरपंचायतकरिता संक्रमणात्मक क्षेत्र मतदारसंघ व नगर परिषदांकरिता लहान नागरी क्षेत्र मतदारसंघ या तिन्ही मतदारसंघातील अनुक्रमे २१, १ व २ पदांसाठी ही निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीसाठी मतदारांची प्रारुप यादीबाबत आक्षेप असल्यास १३ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन शाखेत सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्यानुसार यासंदर्भात प्राप्त झालेल्या आक्षेपांनुसार सुधारणा करण्यात आली असून, अंतिम मतदार यादी दि. १४ जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालय , सर्व मुख्याधिकारी, सर्व मुख्याधिकारी (नगरपंचायत) तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द केली आहे.