लाेकमत न्यूज नेटवर्क
आबलोली/अमोल पवार : वृक्षांचे संवर्धन हाेण्यासाठी, वनसंपदा वाढण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे ‘कन्या वनसमृद्धी याेजना’ राबविण्यात येत आहे. या याेजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर पालकांनी तिच्या पहिल्या पावसाळ्यात दहा वृक्षांची लागवड करून त्यांची मुलीप्रमाणे संगाेपना करायची आहे.
ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल, अशा शेतकरी दाम्पत्याला १० रोपे विनामूल्य देऊन प्रोत्साहित करणे, पर्यावरण, वृक्ष लागवड व संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता इत्यादीबाबत सध्याच्या आणि भावी पिढीमध्ये आवड निर्माण करण्यासाठी ही याेजना राबविण्यात येत आहे. तसेच मुलगा आणि मुलगी समान असून, महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देणे तसेच मुलींच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवणे, या उद्देशाने शासनाने ही योजना सुरू केली आहे.
सामाजिक वनीकरण विभाग व वन विभाग यांच्यातर्फे गुहागर तालुक्यातील आबलोली व खोडदे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील १५ लाभार्थ्यांना प्रत्येकी १० वृक्षांचे वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल ए. बी. निमकर, वन विभागाचे वनपाल एस. व्ही. परशेट्ये, वनरक्षक एस. बी. दुंडगे, ‘बार्टी’च्या समतादूत शीतल पाटील, पंचायत समिती सभापती पूर्वी निमुणकर, सरपंच तुकाराम पागडे, ग्रामपंचायत सदस्य आशिष भोसले, मीनल कदम, मुग्धा पागडे, अमोल पवार, योगेश भोसले, अमोल शिर्के यांच्यासह प्राथमिक शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, कन्यांचे पालक उपस्थित होते. समतादूत शीतल पाटील यांनी कन्या वनसमृद्धी योजनेविषयी मार्गदर्शन केले.
खोडदे ग्रामपंचायत येथे झालेल्या कार्यक्रमाला सरपंच प्रदीप मोहिते, उपसरपंच लवेश पवार, ग्रामसेवक महेंद्र निमकर, सदस्य विनायक गुरव, रिया साळवी, ऋतिका मोहिते, नितीन मोहिते, वैभव निवाते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश भोसले यांनी केले तर नितीन मोहिते यांनी आभार मानले.
----------------------------------
‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ या उक्तीप्रमाणे घरात जन्माला आलेल्या मुलीच्या पालकांनी तिच्या पहिल्या पावसाळ्यात दहा वृक्षांची लागवड करावी. आपल्या मुलीप्रमाणे झाडांचे संगोपन करावे. घरात जशी मुलगी मोठी होईल त्याप्रमाणे परसदारात हे वृक्ष बहरतील.
- ए. बी. निमकर, वनपाल, सामाजिक वनीकरण, गुहागर