रत्नागिरी : सध्या भातशेती पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. रोहिणी नक्षत्रावर काही शेतकरी धूळवाफेच्या पेरण्यांना प्रारंभ करीत असतात. त्यासाठी लागणारी खते, बी-बियाणे खरेदी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. मात्र खरेदी करीत असताना, शेतकऱ्यांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदीसाठी प्राधान्य द्यावे. बनावट/भेसळयुक्त बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडे पावतीसह खरेदी करावी. खरेदी केलेल्या बियाणांचे वेष्टण/पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पाकिटे सीलबंद/मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावर अंतिम मुदत पाहून घ्यावी.
कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. कीटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी. शेतकऱ्यांनी तक्रारीविषयी माहिती प्रत्यक्ष/दूरध्वनी/ई-मेल/ एसएमएस इत्यादीव्दारे देऊन शासनाच्या गुणनियंत्रण अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कृषी निविष्ठांविषयी असलेल्या अडचणी/तक्रारी सोडविण्यासाठी /मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख अजय शेंडे यांनी केले आहे.