लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहरातील काविळतळी येथे वाशिष्ठी कृषक सहकारी संस्था अंतर्गत २१ गावे येतात. त्या गावातील शेतकऱ्यांना गेली ७ ते ८ दिवस झाले खत उपलब्ध होत नव्हते. येथे दररोज शेतकरी येतात पण खत उपलब्ध होत नाही. वेळेला खत मिळाले नाही तर शेती करून काहीही उपयोग होणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. याबाबत युवा सेनेचे तालुका अधिकारी उमेश खताते यांनी खासदार विनायक राऊत यांच्याशी संपर्क साधला. खासदारांनी कृषी मंत्री भुसे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर दोन-तीन दिवसात खत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खते उपलब्ध होत नसल्याने सोमवारी २१ गावातील ५० ते ६० शेतकरी याठिकाणी येऊन वाद घालून गेले होते. ही बाब युवासेना तालुका अधिकारी खताते यांना समजताच थेट संस्था गाठली. सोबत शिवसेना उपशहर प्रमुख भय्या कदम, युवासेना तालुका सचिव प्रतीक शिंदे, खेर्डी युवासेना शाखा प्रमुख राहुल भोसले, शुभम चिपळूणकर, नीलेश शिगवण आदी शिवसैनिक व १५ ते २० शेतकरी सोबत घेऊन चेअरमन दादा बैकर यांची भेट घेतली. या विषयावर चर्चा केली. यावेळी बैकर यांनी सांगितले की, संस्थेने २५० टन खताची मागणी केलेली असताना केवळ ४५ टन खत उपलब्ध झाले. कंपन्यांकडूनच खत उपलब्ध होत नाही. वरिष्ठांच्या कानावर घालत विषय मार्गी लावता येईल, असे चेअरमन बैकर यांनी खताते यांना सांगितले. यानंतर उमेश खताते यांनी थेट खासदार विनायक राऊत यांना खतांच्या तुटवड्याची माहिती दिली. त्यावर खासदारांनी कृषी मंत्री दादा भुसे व जिल्हा कृषी अधिकारी घोरपडे यांना संपर्क साधून संस्थेला मागणीनुसार खत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यामुळे चिपळूण मधील शेतकऱ्यांना मागणीनुसार खत मिळण्यास मदत होणार असल्याचे खताते यांनी सांगितले. यानंतर आर.सी.ई.एफ कंपनीचे प्रवीण शहाकर यांच्याशीही खताते यांनी चर्चा केली. येत्या दोन दिवसांत चिपळूण तालुका वाशिष्ठी कृषक संस्थेला खत उपलब्ध होईल, असे सांगितले.