लांजा : बँक ऑफ इंडिया, लांजा शाखेने शेतकरी दिनानिमित्त शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बँक ऑफ इंडिया, रत्नागिरी विभागाचे उपआंचलिक प्रबंधक के. आर. कंदी, ऋण निगराणी विभागाचे अधिकारी मयांक घई, लांजा शाखेचे व्यवस्थापक नितीन चव्हाण, कृषी अधिकारी प्रियांका बेर्डे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बँक ऑफ इंडिया, रत्नागिरी विभागाचे उपआंचलिक प्रबंधक के. आर. कंदी यांना शेतीबद्दल प्रचंड आस्था असल्याने त्यांनी उद्योजकता वाढावी यासाठी बँक कशाप्रकारे भर देते, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच येत्या दोन महिन्यांत तरुण शेतकरी उद्योजक व शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ आणि बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून कोकणात जास्तीत जास्त कृषीवर आधारित व्यवसाय सुरू करण्यावर भर दिला जाईल. तसेच शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी मेळावे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी लांजा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.