मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण
रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यांच्यातर्फे दिनांक १ जुलैपासून मच्छीमार तरुणांना नौकानयनाची तत्वे, मासेमारी अवजारांचा वापर व मरिन डिझेल इंजिनची देखभाल व निगा याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात हे प्रशिक्षण होणार असून, अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी ३० जूनपूर्वी कार्यालयाकडे संपर्क साधावा.
नाखरे येथे लसीकरण
रत्नागिरी : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत नाखरे येथे ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते. या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. १११ नागरिकांना लस देण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कांबळे उपस्थित होते.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन पावसाळी भाजीपाला उत्पादन, तंत्रज्ञान यावर वेबिनार आयोजित केला होता. डॉ. प्रकाश सानप यांनी वेलवर्गीय भाजीपाला उत्पादन तर प्रा. योगेश परुळेकर यांनी भेंडी व पालेभाज्या लागवडीविषयी माहिती दिली.
मोफत मास्क वाटप
दापोली : आपला गाव कोरोनामुक्त व्हावा, या संकल्पनेतून कोकण भूमिपुत्र, कन्या, युवा सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील भडवळे गावातील नागरिक, विद्यार्थी यांना १,५०० मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी सचिन रेमझे, नारायण रेवाळे, रामचंद्र देवरे उपस्थित होते.
कडुलिंबाची लागवड
गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कोतळूक शाखाध्यक्ष दिनेश निवाते यांच्या हस्ते कडूलिंबाच्या झाडाचे रोपण करण्यात आले. यावेळी विविध रोपांची लागवड करण्यात आली.
लसीकरणाची मागणी
देवरुख : कोरोनामुळे जिल्हा अनलॉक जाहीर करण्यात आला आहे. मात्र, एस. टी. सेवा पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. आगारातील कर्मचारी, वाहनचालक यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. लसीकरणाचे दोन्ही डोस लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
खड्ड्यांचे साम्राज्य
आरवली : मुंबई - गोवा महामार्गावरील माभळे पुनर्वसन येथील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्डे चुकवून वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. पावसाळा सुरु असल्याने अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच खड्डे जीवघेणे ठरत आहेत.
विलगीकरण कक्ष सुरु
देवरुख : संगमेश्वर - कसबा याठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या जागेत संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक, संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, तहसीलदार सुहास थोरात, आरोग्य अधिकारी एस. एस. सोनावणे, आदी उपस्थित होते.
कोंबड्यांना मागणी
रत्नागिरी : मृग नक्षत्रात शेतकरी कुटुंब राखणी देत असल्याने राखणीकरिता कोंबड्यांना मागणी होत आहे. ३०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत कोंबड्यांच्या किमती सांगण्यात येत आहेत. अनेक वर्षे ही परंपरा सुरु असून, राखणीसाठी काही गावातून मुंबईकरसुद्धा दाखल झाले आहेत.