चिपळूण : तालुक्यातील मोरवणे गावाची ‘जैविक गाव’ म्हणून निवड झाली आहे. येथे सलग तीन वर्षे सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताचा वापर करून विविध पिके घ्यावीत, यासाठी मोरवणे येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला आणि जनजागृती करण्यात आली.
गतवर्षी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सेंद्रिय (जैविक) गाव म्हणून एका गावाची निवड करण्यात आली होती. चिपळुणात या योजनेत मोरवणे गावची निवड झाली. गतवर्षापासून मोरवणेतील शेतकरी सेंद्रिय शेतीची कास धरू लागले आहेत. या योजनेच्या माध्यमातून तालुक्यात सर्वाधिक ३० बायोगॅस मोरवणे येथे उभारले आहेत. बायोगॅसच्या माध्यमातून मिळालेले सेंद्रिय खत शेतीसाठी वापरले जात आहे.
खरीप हंगामाविषयी शेतकऱ्यांना माहिती मिळावी, यासाठी मोरवणे येथे प्रक्षेत्र भेट कार्यक्रम आणि शेतकरी मेळावा घेण्यात आला. सभापती पांडुरंग माळी, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, कृषी विकास अधिकारी शेंडे, कृषी अधिकारी जानवलकर, सुनील गावडे आदींनी सेंद्रिय शेतीचे धडे दिले.
यावेळी सभापती माळी म्हणाले की, सेंद्रिय खताचा वापर केलेल्या पिकांना तसेच फळांना बाजारात चांगली मागणी आहे. आरोग्यासाठीही ते फलदायी आहे. सेंद्रिय खताच्या वापरामुळे शेती उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होत आहे. त्यामुळे गावातील सर्वच शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर बंद करून सेंद्रिय शेतीची कास धरावी.
यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी तालुका कृषी व पंचायत समितीकडील कृषी विभागाच्या विविध योजना सांगितल्या. या योजनांचा लाभ घेण्याचेही त्यांनी आवाहन केले. यानिमित्ताने मोरवणेतील शेतीची पाहणी करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे, संदीप कांबळे, मंदार जोशी, मोरवणेच्या सरपंच संचिता जाधव, सुनील सावर्डेकर, ग्रामसेविका रेश्मा ठाकूर, सर्व सदस्य, विस्तार अधिकारी भास्कर कांबळे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.