अडरे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाच्या कृषी विभागातर्फे फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मान्सून सुरु होण्यापूर्वी ग्रामपंचायतीमार्फत अर्ज कृषी सहाय्यकांकडे सादर करावेत, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी यांनी केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीची अमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे. फळबाग लागवड कार्यक्रमामुळे लाभार्थ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन सहभागी लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. फळबाग लागवडीच्या कामाकरिता कृषी विभाग हा अमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्यरत आहे. तालुका कृषी अधिकारी यांना कार्यक्रम अधिकारी म्हणून घोषित केले आहे. प्राप्त प्रस्तावांना तांत्रिक मान्यता तालुका कृषी अधिकारी तर प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना असून, तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता ओसाड पडलेले डोंगर, पड असलेली जमीन यामध्ये फळबाग लागवड करून शाश्वत उत्पन्नाचे साधन म्हणून पाहावे. यामध्ये आंबा कलमे, काजू कलमे, नारळ, सुपारी, चिकू, आदी कलम व रोपे यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड या योजनेत सहभागी होऊन फळबाग लागवड करावी, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी यांनी केले आहे.