आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली परिसरात मागील चार दिवस सतत पडणाºया मुसळधार पावसामुळे भातशेती, नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तयार झालेली उभी पिके बळीराजाने कापून ठेवली. मात्र, पाऊस पुन्हा सुरू झाल्याने ती पिके घरी घेण्याचीही उसंत मिळाली नाही. सध्या ही कापलेली पिके पाण्यावर तरंगत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. शेतातून भर पावसाळ्यासारखे पाणी पुन्हा वाहू लागले आहे. पाऊस असाच पडत राहिला तर भाताला मोड येऊन पीक वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा मेटाकुटीस झाला आहे. भात हेच प्रमुख पीक असल्याने वर्षभर शेतात राबणारा बळीराजा याच सुगीच्या दिवसांची वाट पाहत असतो. मात्र पावसाच्या या लहरीपणामुळे पीक पाण्यात कुजणार आहे तसेच जनावरांना पेंढा पण मिळणार नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकºयांना नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.