मेहरुन नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : श्रावणात बहुतांश मंडळी उपवास करीत असल्याने फराळ सेवन केला जातो. त्यामध्ये शक्यतो साबुदाणा, शेंगदाणा, फळांचा वापर करण्यात येतो. उपवासामुळे थकवा येतो, कॅलरीज कमी होतात. त्यामध्ये आरोग्यवर्धक आहारावरच भर दिला जातो. साबुदाणा व शेंगदाण्यामध्ये पोषक घटक असल्याने याचा वापर सर्वाधिक केला जातो. श्रावणात साबुदाणा व शेंगदाण्याला जास्त मागणी असल्याने दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे.
साबुदाण्यामध्ये कॅलरीज, कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील मेटाबाॅलिज स्तराची पातळी संतुलित ठेवते. ग्लुकोज स्वरूपात शरीराला ऊर्जा मिळवून देण्यास मदत करते. त्यामुळे उपवासामुळे शरीरात निर्माण झालेली उष्णता कमी करण्यास मदत होते. शेंगदाण्यात प्रोटीन्स, फायबर खनिजे, व्हिटॅमिन्स, ॲन्टिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे उपवासात शेंगदाणा, साबुदाण्याचा वापर सर्रास केला जातो.
शेंगदाणा, साबुदाण्यासाठी अन्य दिवसांपेक्षा श्रावणात मागणी अधिक असल्याने दरात वाढ झाली आहे. साबुदाण्याच्या दरात किलोमागे नऊ रुपयांनी, तर शेंगदाण्यामध्ये किलोमागे दहा रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी उपवासात शेंगदाणा व साबुदाण्याचे पदार्थ सेवन करणे अशक्य बनले असल्याने मागणीवर परिणाम झाला आहे. वरीचे तांदूळ किंवा भगरीचे दर मात्र स्थिर आहेत.
भगरीचे दर मात्र स्थिर
उपवासामुळे जास्त वेळ पोट रिकामे राहत असल्याने पित्ताचा त्रास वाढतो. मात्र साबुदाणा न खाणारी मंडळी वरीच्या तांदळाचा भात किंवा शेंगदाण्याची आमटी सेवन करतात. वरीचे तांदूळ किंवा भगर यामध्ये पोषक घटक असल्याने याला मागणी आहे. वरीच्या तांदळाचे दर मात्र स्थिर आहेत. १२० रुपये किलो दराने विक्री होत आहे. साबुदाणा, शेंगदाणा दरातील वाढीमुळे मागणीवर परिणाम झाला असला तरी, भगरीच्या मागणीत फारशी वाढ झालेली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
पोषक शेंगदाणा
n शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम व व्हिटॅमिन ‘डी’चे प्रमाण सर्वाधिक असल्याने हाडे मजबूत होतात.
n शेंगदाण्यात ‘ओमेगा फॅट’ अधिक प्रमाणात असते, जे त्वचेसाठी उपयुक्त असते.
n पचनशक्ती वाढते, भूक न लागण्याची समस्या दूर होते.
फायदेशीर साबुदाणा
n शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्याबरोबरच ऊर्जा वाढविण्यास फायदेशीर ठरतो.
n प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फायबर साबुदाण्यात भरपूर असल्याने उपयुक्त
n कृश प्रकृतीच्या व्यक्तींना वजन वाढविण्यासाठीही फायदा होतो.
श्रावणापूर्वी शेंगदाणा, साबुदाण्याचे दर व मागणी स्थिर होती. मात्र श्रावणामुळे मागणीत वाढ झाल्याने दरावर परिणाम झाला होता. परंतु दरवाढीनंतर आता मागणी घटली आहे. जिल्ह्यात शेंगदाणा, साबुदाणा हा वाशी (नवी मुंबई), कोल्हापुरातून येतो. शेंगदाणा व साबुदाण्याच्या दर्जानुसार दरात फरक झाले आहेत. घाऊक बाजारातच दरात वाढ झाली असल्याने किरकोळ विक्रीवर परिणाम झाला आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्र येत असल्याने दरातील वाढ कमी होणे अशक्य आहे.
- ए. एस. मेमन, रत्नागिरी.