गुहागर : शेवटची घटका मोजत असलेल्या वडिलांना पाहायला आलेली विवाहिता, तिचा पती व अन्य नातेवाईक तवेरा गाडीमधून पुन्हा मुंबईकडे जात असताना महाड पूल अपघातामध्ये त्यांची गाडी वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. गुरुवारी सापडलेल्या मृतदेहामध्ये या गाडीमधील संपदा वाजे (३७) व जयवंती मिरगल (७०) यांचा समावेश होता. लाडक्या मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेने तिच्या वडिलांना तो धक्का सहन झाला नाही आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ही सर्व मंडळी मंगळवारी सायंकाळी ८ वाजता सडेजांभारी येथून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली. रात्री १० च्या सुमारास या सर्वांनी पोलादपूर येथील हॉटेलमध्ये एकत्रित जेवणही केले. त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने निघाले. त्यांना सकाळी फोन केला असता ते मुंबईत पोहोचलेच नसल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय यंत्रणेला दिली. त्यामुळे त्यांच्या ताब्यात असलेली (एमएच ०४ जीटी ७८३७) ही तवेरा गाडी व त्यामधील सर्व व्यक्ती महाड येथील पूल अपघातामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. ही भीती खरी ठरली असून, शोधपथकाला गुरुवारी सकाळी ११च्या सुमाराला संपदा संतोष वाजे व जयवंती सखाराम मिरगल या दोघांचे मृतदेह सापडले, तर अन्य व्यक्तिंचा शोध लागला नाही. त्यांच्या गाडीमध्ये गुहागरची माहेरवाशीण संपदा संतोष वाजे (३७, मूळ गाव शेनवडे, संगमेश्वर सध्या राहणार घाटकोपर) या आपल्या गावाकडील आजारी वडील रघुनाथ मिरगल (सडेजांभारी-गवळीवाडी, ता. गुहागर) यांना पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्यासोबत पती संतोष सीताराम वाजे (४०) व मुंबईत राहणारे गावातील अन्य नातेवाईक जयवंत सखाराम मिरगल (४०), बाबा सखाराम मिरगल (३६), जयवंती सखाराम मिरगल (७०), दत्ताराम भागोजी मिरगल (६१) आदिनाथ कांबळे (४५), दिनेश सखाराम कांबळे (४०) आदी सर्व मंडळी व गाडीचा चालक वीर आदी ९ ते १० माणसे होती. (प्रतिनिधी)वाजे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरही सर्व मंडळी खास मुंबईहून गुहागर-सडेजांभारी येथे ज्या वयोवृध्द रघुनाथ मिरगल यांना पाहावयास आली होती. त्यांचे या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी रात्री निधन झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली. त्यामुळे ज्यांना पाहण्याच्या हेतूने ही मंडळी आली होती. ते देखील या जगात राहिली नसल्याने गुहागर - संगमेश्वरमधील संपूर्ण मिरगल व वाजे कुटुंबियांवर दु:खाचा मोठा डोंगर पडला आहे.
मुलीच्या दुर्घटनेने कळवळलेल्या पित्यानेही प्राण सोडले;
By admin | Published: August 05, 2016 12:48 AM