रत्नागिरी : राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाबरोबरच डेंग्यूच्या साथीने थैमान घातलेले असताना रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूच्या तापाचे प्रमाण अत्यल्प आहे. वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात डेंग्यूचे केवळ २१ रुग्ण आढळले असून, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता डेंग्यूची भीती राहिलेली नाही.जिल्हा अजूनही कोरोनातून भयमुक्त झालेला नाही. मात्र, डेंग्यूची भीती कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप विभागाकडून मोठ्या प्रमाणात डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून डेंग्यूच्या निर्मूलनासाठी विविध कार्यक्रम आयोजित करुन त्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.जिल्ह्यात सन २०१९मध्ये डेंग्यूचे २२९ रुग्ण आढळले होते. मात्र, आरोग्य विभागाकडून त्या रुग्णांवर वेळीच उपचार केल्याने एकही रुग्ण दगावला नव्हता. त्यानंतर चालू वर्षात जानेवारी २०२०पासून आतापर्यंत जिल्ह्यात ८० संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी २१ डेंग्यूचे रुग्ण आढळले असून, त्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.
यामध्ये दापोलीमध्ये ८ रुग्ण, संगमेश्वरात २, रत्नागिरीत ७, लांजात १ आणि राजापुरातील ३ रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये स्थानिक १२ रुग्ण आणि स्थलांतरित ९ रुग्ण आहेत. यावर्षीही डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण शून्य आहे.डेंग्यू हा एडीस् इजिटी या डासापासून होतो. डेंग्यू तापाकडे दुर्लक्ष झाल्यास तो जीवघेणा ठरु शकतो. यासाठी गप्पी माशांची पैदास केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्याचाही खूप उपयोग होत आहे.डेंग्यूची लक्षणेअचानक जोराचा ताप येणे, डोक्याचा पुढचा भाग खूप दुखणे, डोळ्याच्या मागील भागात वेदना होणे, स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना होणे, छाती आणि त्यावर गोवरासारखे पुरळ येणे, मळमळणे आणि उलट्या होणे, त्वचेवर व्रण उठणे.खासगी रूग्णालयांतून डेंग्यू रूग्णांची माहिती मिळते का?जिल्ह्यात डास निर्मूलनाचा कार्यक्रम राबविण्यात येतो. तसेच डेंग्यूच्या रुग्णांबाबत खासगी रुग्णालयांनाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एखाद्या खासगी रुग्णालयामध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास या रुग्णालयाकडून तत्काळ आरोग्य विभागाला रुग्णाबद्दलची माहिती कळविण्यात येते.
जिल्ह्यात इकोफ्रेन्डली डास निर्मूलन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोरडा दिवस पाळला जातो. त्याचबरोबर कंटेनर सर्वेक्षण करुन पॉझिटिव्ह आढळून आल्यास तेथे कीटकनाशकाची फवारणी केली जाते.- डॉ. संतोष यादव , जिल्हा हिवताप अधिकारी, रत्नागिरी.