राजापूर : आठ किंवा पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन होण्याच्या भीतीने राजापूरच्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली आहे. यावेळी विनामास्क फिरणाऱ्या १५ जणांवर राजापूर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली, तर ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी व रविवारी राजापूर शहर आणि तालुका परिसरात मिनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्यात आले. मात्र, पुढील काही दिवसात लॉकडाऊन होणार या भीतीने शहरासह ग्रामीण भागातही लोकही सोमवार व मंगळवारी खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल झाल्याने खूप गर्दी झाली होती. किराणा दुकाने आणि भाजीपाल्याच्या दुकानात मोठी गर्दी होती.
मात्र, पोलिसांकडून बाजारपेठेत फेरफटका मारून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत होते. मास्क न वापरणाऱ्या १५ जणांविरोधात पोलिसांनी प्रत्येकी ५०० रूपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करत ७,५०० रुपयांचा दंड वसूल केला, तर चार जणांविरोधात मुंबई पोलीस कायदा कलम २७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, पोलीस हवालदार सरेश जाधव, गुप्त शाखेचे सागर कोरे, वाहतूक पोलीस सचिन बळीप यांनी ही धडक कारवाई केली.