रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या घरपट्टी वसुलीसाठी जप्ती वाहन गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात फिरत असून, करवसुली मोहीम जोरात सुरू आहे. घरपट्टी न भरलेल्यांकडे नगरपरिषदेचे अधिकारी मालमत्ता जप्ती वाहनासह दाखल होत असल्याने थकबाकीदारांनी धसका घेतला आहे. मात्र, या मोहिमेमुळे घरपट्टी वसुलीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पालिकेच्या करवसुली विभागाच्या सुत्रांनी दिली. रत्नागिरी नगर परिषदेने हळूहळू थकित करवसुलीविरोधात आता जोरदार मोहीम राबवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार कार्यवाहीदेखील सुरू झाली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेला प्रतिवर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात करवसुली मोहीम राबवावी लागते. याआधी कर थकीत असलेल्यांना १५१ अंतर्गत नोटीस दिली जात होती. परंतु कायद्यात बदल झाल्यानंतर आता ही नोटीस देणे बंद झाले आहे. आता थेट जप्तीची नोटीस देण्यात येते. त्याअंतर्गत करवसुली विभागाने अशा जप्तीच्या नोटीस तयार केल्या असून, गेल्या पंधरा दिवसांपासून घरपट्टी थकबाकीदारांच्या घरी जप्ती वाहन फिरत आहे. या जप्ती वाहनांद्वारे पालिकेचे वसुली अधिकारी व कर्मचारी कर थकबाकीदारांच्या घरी नोटीस देत असून, त्याच ठिकाणी करवसुलीचे प्रमाण मोठे आहे. या मोहीमेला चांगले यश मिळाले असून, थकबाकीदारांकडून कर जमा केला जात असल्याचेही सुत्रांनी सांगितले. मार्चअखेर असल्याने करवसुलीच्या कामाला पालिकेने अधिक वेग दिला आहे. त्यानुसार शहरातील सातही प्रभागांमध्ये ही मोहीम राबविली जात आहे. रत्नागिरी नगरपरिषदेअंतर्गत करपात्र असलेल्या २३५३९ मालमत्ता आहेत. त्यांच्या घरपट्टीपोटी २०१४-१५ या आर्थिक वर्षात नगरपरिषदेला ७ कोटी ९० लाखांचे कर उत्पन्न मिळणार आहे. फेबु्रवारी २०१५ अखेर कर विभागाने ४ कोटी २३ लाखांची वसुली केली असून, वसुलीची ही टक्केवारी ५५ टक्के आहे. गेल्या आठवडाभरात आणखी कर वसुली झाली असून, वसुलीची ही टक्केवारी ६० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. खऱ्या अर्थाने मार्च महिन्यातच मोठ्या प्रमाणात घरपट्टी भरली जाते. मात्र, वसुली मोहीमेमुळे घरपट्टी भरणा करण्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सुत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
घरपट्टी न भरणाऱ्यांना भीती
By admin | Published: March 06, 2015 12:17 AM