रत्नागिरी : कोरोनाची दुसरी लाट संपत असतानाच आता तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तिसऱ्या लाटेत बालके मोठ्या प्रमाणावर बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्यांची मुले लहान आहेत, अशा पालकांना मुलांची भीती सतावू लागली आहे.
पिंपळ कोसळून नुकसान
चिपळूण : तालुक्यातील निर्व्हाळ, गणेशवाडी येथे शुक्रवारी दुपारी पिंपळाचे महाकाय झाड कोसळल्याने मंगला जाधव यांच्या घराचे शेड आणि कौलारू छपराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास हे झाड कोसळले. यात लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
फसवणुकीचे प्रकार वाढले
रत्नागिरी : सध्याऑनलाइन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. सध्या सर्वत्रच लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र यातूनही काही आपला गल्ला भरू लागले आहेत. आपले लसीकरण झाले आहे का? असे विचारत अनेकजण खुबीने ओटीपी विचारून खात्यावरील रक्कम परस्पर लांबवत आहेत.
बागायतदार धास्तावले
गुहागर : आंबा हंगाम शेवटच्या टप्प्यात असतानाच आता चक्रीवादळाचे संकट समोर ठाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून बदलत्या वातावरणाचा परिणाम आंबा हंगामावर होत होता. काहींची फळे अजूनही झाडांवर आहेत. त्यातच आता चक्रीवादळ उभे राहिल्याने बागायतदार धास्तावले आहेत.
विंधन विहिरी वाढल्या
पाली : रत्नागिरी तालुक्यातील पाली परिसरात सध्या विंधन विहिरी उभारण्याचे काम सुरू झाले आहे. काहींना चांगले पाणी उपलब्ध झाल्याने या विहिरी खोदण्याकडे नागरिकांचा कल अधिक वाढलेला दिसून येत आहे. पाणीटंचाईचा सामना म्हणून विंधन विहिरी खणण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे.