रत्नागिरी : ईदच्या आनंदात महापुराचे संकट येणार असल्याची पुसटशी कल्पनाही नव्हती. गुरूवारी पहाटे आलेल्या पुरामध्ये पंधरा वर्षांचा माझा संसार वाहून गेला आहे. फक्त मी मुलांना वाचवू शकले, एवढीच गोष्ट माझ्यासाठी मोठी असल्याचे सांगून नजराणा मेहबूब मुजावर (रा. शंकरवाडी, चिपळूण) यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
नजराणा या चार मुलांसमवेत गेली १५ वर्षे चिपळूण येथे राहतात. गुरूवारी पहाटे फज्रचा नमाज झाला. घरातील कामे उरकत असतानाच पाण्याचा आवाज आला. आजूबाजूला जोरदार आरडाओरडा सुरू झाली. मुले तर झोपलेलीच होती. काही क्षणात घरात पाणी आले, प्रसंगावधान राखून मुलांच्या मदतीने फ्रीज काढून जेमतेम बेडवर ठेवला. तोपर्यंत शेजारचे शिंदे काका धावत आले. मुलांना घेऊन बाहेर पडा सांगताच मी मुलांना घेऊन बाहेर पडले. रस्त्यावर आलो तोपर्यंत छातीएवढं पाणी होतं. पाण्यातून चार मुलांना घेऊन जाताना रस्त्यालगतच गणेश गोंधळेकर यांच्या इमारतीचे काम सुरू होते तेथील कामगारांनी आम्हाला पाहिलं, त्यांनी मदत करून गोंधळेकर यांच्या इमारतीच्या गच्चीवर नेलं. तेथे माझ्यासारखीच दोन अन्य कुटुंब थांबली होती. इमारतीचे दोन्ही मजले पाण्याखाली होते. इमारतीच्या चहूबाजूला पाणी असल्याने घाटगे यांनी दोरी बांधून त्याव्दारे एका भांड्यात खिचडी व पाण्याच्या बाटल्या एका पिशवीतून आम्हाला पाठवल्या. चारही मुलांना जवळ घेऊन कशीतरी आम्ही तीन कुटुंबांनी रात्र काढली.
वीज पुरवठा तर बंदच होता. मात्र, मोबाईलला रेंज येत-जात होती. रेंज आली तर नातेवाईकांचा फोन यायचा, खुशाली विचारायचे, मात्र रेंज गेली की, फोन कट व्हायचा. माझी मैत्रीण शगुफ्ता हिने फोन करून मला धीर दिला, घाबरू नकोस, पाणी कमी झालं की, कुणाच्या तरी मदतीने माझ्या घरी ये, असे सांगितले. शुक्रवारी सकाळी पाण्याची पातळी ओसरल्यानंतर मुलांना कवटाळून शगुफ्ताच्या घरची वाट धरली. पाणी ओसरलं असलं तरी सर्वत्र चिखल साचला आहे. गेल्या १५ वर्षांचा संसारच वाहून गेला आहे.