पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १५ रोजी रात्री आठ वाजता आकाश वर्मा नावाच्या इसमाने फिर्यादी कटमाले यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाची तुम्हाला ४० लाख रुपयांची लॉटरी लागली असून, ती रक्कम हवी असेल तर त्या रकमेचा टॅक्स भरावा लागेल, असे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने कटमाले यांच्या व्हॉटस्ॲप क्रमांकावर दुबई इस्लामिक बँकेचा त्यांच्या नावे असलेला चाळीस लाख रुपयांचा धनादेशाचा फोटो तसेच आकाश वर्मा या नावाच्या व्यक्तीचा फोटो व आधारकार्ड यांचा फोटो पाठवला.
सईदा कटमाले यांचा विश्वास संपादन केल्यानंतर संबंधित व्यक्तीने विविध मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून टॅक्सची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार ८ लाख ७६ हजार ७५० रुपयांची रक्कम दिनांक १६ ऑगस्ट सायंकाळी चार वाजेपर्यंत आपल्याकडून भरून घेतली व आपली आर्थिक फसवणूक केली आहे, असे सईदा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आकाश वर्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.
--