अनिल कासारे।लोकमत न्यूज नेटवर्कलांजा : क्यार वादळामुळे ऐन भातकापणीच्या हंगामात पडलेल्या पावसाने तालुक्यातील जवळजवळ पन्नास टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जनावरांना लागणारी वैरणही वाया गेल्याने जनावरांना वर्षभर खायला घालायचे काय? यांची चिंता आता शेतकऱ्यांना पडली आहे.यावर्षी पावसाळी हंगाम सुरू झाल्यापासूनच शेतकऱ्यांची परीक्षा होती. मुळात पाऊस उशिरा आल्याने शेतीचे वेळापत्रक उशिरानेच सुरू झाले. हळवी भातशेती गणपती उत्सव कालावधीत कापणीला येते, हे सर्वसाधारण गणित. पण गणपती उत्सवादरम्यानही पाऊस कमी होण्याचे नाव घेत नसल्याने कापणी झाली नाही.आॅक्टोबर उजाडला तरी पाऊस थांबला नाही. त्यातच आलेल्या क्यार वादळाने शेतकºयांची झोप उडवली. या वादळामुळे जोरदार पाऊस सुरू झाला. पाऊस व वाºयामुळे भातशेती आडवी झाली. शेतामध्ये साचलेल्या पाण्यात भातशेती पडल्याने पिकाला पुन्हा कोंब आले. पाण्यात राहिल्याने भातशेती कुजून गेली. त्यामुळे जनावरांना लागणारी वैरणही वाया गेली. आता दिवाळी संपत आली तरी भातशेतीची कापणी झाली नसल्याने नाचणी व इतर शेतीची कापणी करायची तरी कधी, हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.सद्यस्थितीत हळवी भातशेती करपली आहे. कापणी करताना भाताची लोंब अर्धवट तुटून शेतात पडत असल्याने शेतकºयांना पडलेल्या लोंब्या जमा कराव्या लागत आहेत. पिकलेल्या भातशेतीतील निम्मे भात शेतात पडल्याने ते गोळळा करण्यातच शेतकºयांचा वेळ वाया जात आहे. हळव्या शेतीबरोबरच गरवी शेतीही कापणीला आली आहे. मात्र, हळवी शेतीच अजून बाकी असल्याने पुढील कामही ठप्प आहे.भाताबरोबरच नाचणी शेतीही जमिनीवर पडली आहे. आता उघडीप मिळाल्याने शेतकरी कापणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. शेतांमध्ये अजून पाणी असल्याने कापणी करताना अडचण येत आहेत. भाताप्रमाणेच पेंढाही चांगला सुकला नाही तर तो दमट होऊन जनावरांसाठी निरूपयोगी होतो. आता भातशेती कापणीतून गेल्याने भाताचे दाणे हे अखंड येणार नाहीत. त्याचे तुकडे होणार असल्याने शेतकरी काळजीत पडला आहे. शेतकºयांच्या डोक्यावर ‘माहा’ वादळाचे संकट घोंघावत आहे. सध्या उन्हामुळे जी शेती करपली आहे, त्या भाताचा तांदूळ हा काळपट रंगाचा होईल, अशी भीती आहे.पंचनामे करण्यासाठीपथक शेतावरलांजा तालुक्यात १२३ गावे आहेत. या गावातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी यांच्याकडे ३६ गावे, ग्रामसेवकांकडे ५४ गावे आणि कृषी सहाय्यक यांच्याकडे ३३ गावे अशी विभागणी करुन नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
हातातोंडाशी आलेले पन्नास टक्के पीक वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 11:17 PM