गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. गतवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांमुळे कोकणात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला होता. त्याचप्रमाणे काेरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही वाढली होती. त्यामुळे या गणेशोत्सवात मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जिल्हा प्रशासनाने दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र सादर करा, अन्यथा चाचणी करणे बंधनकारक केले आहे.
गणेशोत्सवात रत्नागिरी जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांना थेट त्यांच्या गावी जाण्याची मुभा जिल्हा प्रशासनाने दिली असली तरी गावी येताना त्यांना त्यांचे कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र किंवा कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. गावी आल्यानंतर त्यांची तपासणी होणार आहे. या तपासणीत एखादी व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह आल्यास ग्राम कृती दल किंवा नागरी कृती दलामार्फत विलगीकरणात दाखल केले जाणार आहे.