२. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर तालुक्यात आरोग्य विभागाकडून ठिकठिकाणी चाचण्या करण्यात येत आहेत. या चाचण्या आरोग्यसेविका करतात. मात्र, आरोग्यसेवक निरुत्साही असल्याचे दिसून येत आहेत. आरोग्यसेविका व आरोग्यसेवक या दोघांनाही अँटिजन चाचणी कशी करतात, याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे आरोग्यसेविकांनीच फक्त चाचणी करावी का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आरोग्यसेविका कोरोना रुग्णांना भेटी देतात. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण जास्त आहे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
३. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खेड तालुक्यातील रघुवीर घाटात पर्यटनासाठी जाण्यास एक महिना प्रशासनाने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर वीकेंडला पर्यटक नजर चुकवून घाटात जाण्याच्या शक्यतेने पर्यटकांना रोखण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ नाकाबंदी करण्यात येत आहे. या ठिकाणी पोलिसांसह ग्राम कृती दलाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रघुवीर घाटातील फेसाळत कोसळणाऱ्या धबधब्यांची पर्यटकांना भुरळ पडत होती. यामुळे या घाटात पर्यटकांची गर्दी उसळत होती. त्यामुळे या घाटात पर्यटनासाठी जाण्यास अटकाव करण्यात आला. तसेच येथील हॉटेल्सही सील करण्यात आली आहेत.