रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहतूक बसला अपघात होऊन देवरूखातील दोन चालक जखमी झाले आहेत. त्यामुळे मनसेचे राज्य परिवहन कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुनील साळवी यांनी जुन्या प्रवासी बसेसच्या सीट काढून त्या गाड्या मालवाहतुकीसाठी वापरल्या जात असल्याचा आरोप केला आहे. अपघातप्रकरणी परिवहन मंत्री, एस. टी.चे विभाग नियंत्रक ट्रॅफिक वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक जबाबदार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.
जुन्या प्रवासी गाड्यांच्या सीट काढून त्या गाड्यांमधून मालवाहतूक केली जाते. नऊ ते दहा टनांपेक्षा अधिक वजनाची अवैधरीत्या मालवाहतूक केली जात असल्याचा आरोप उपाध्यक्ष साळवी यांनी केला आहे. चालक-वाहक गाडीच्या अपघाताला जबाबदार नाहीत. मात्र, जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल न झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला असून, या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे. हे निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
जुन्या गाड्यांची मालवाहतूक करण्याची क्षमता नाही; मात्र कोणत्यातरी अध्यादेशाचा आधार घेत कामगारांवर दबाव टाकून त्यांना जबरदस्तीने मालवाहतूक करण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर - मेढा मार्गावर मालवाहू बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात मालवाहक गाडीचे दोन चालक मयूर पावनीकर व रामकिशन केंडे गंभीर जखमी झाले आहेत. हे दोन्ही चालक देवरूख आगारातील असून, या दुर्घटनेनंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अपघाताचा गुन्हा चालकांवर दाखल न करता तो संबंधित अधिकाऱ्यांवर करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.