खेड : कोविड प्रतिबंधक पहिला किंवा दुसरा डोस घेतला का? अशी विचारणा करीत रात्री आठ वाजता खेड नगरपालिका कार्यालयात या, असे सांगून कोरोना महामारीत मनात भीती निर्माण करून, संसर्ग पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञाताविरोधात खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि ७ मे रोजी सायंकाळी ५़४५ वाजता घडली.
या प्रकरणी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक महेंद्र मोरेश्वर शिरगावकर यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शहरातील सलाम तांबे यांना ९४३२८१४६९२, ९४३२४२३८४९ या क्रमांकांवरून त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने फोन केला़ या व्यक्तीने कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोस आपण किंवा आपल्या घरातील माणसांनी घेतला आहे का, अशी विचारणा केली. लस घेतली नसेल तर नगरपालिका कार्यालयात रात्री आठ वाजता या, अशी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली. कोरोनाचा प्रसार व्हावा यासाठी ही फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैशाली आडकूर करीत आहेत.