रत्नागिरी : तालुक्यातील वाटद खंडाळा येथे सरकारमान्य माडी विक्री केंद्रात संगनमताने भेसळयुक्त माडी तयार केल्याप्रकरणी दोघांविरोधात जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २७ नोव्हेंबर, २०२० रोजी करण्यात आली होती. या गुन्ह्यातील भेसळयुक्त माडीचा अहवाल आल्यानंतर, याबाबत शनिवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला.
पाेलिसांनी जितेंद्र रवींद्र वझे (रा.सैतवडे, रत्नागिरी) आणि हेमंत तुकाराम मयेकर (रा.काळबादेवी, रत्नागिरी) यांच्या विराेधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात अन्नसुरक्षा अधिकारी दशरथ मारुती बांबळे (५६, रा.साळवीस्टॉप, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. या दाेघांनी संगनमताने सरकारमान्य माडी विक्री केंद्रात भेसळयुक्त माडी तयार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर करत आहेत.