रत्नागिरी : पूर्वी माणशी दोन लीटर मिळणारे रॉकेल केवळ २०० मिलिलीटरवर आल्याने शासनाच्या या धोरणाबाबत ग्राहकांनी ‘एवढ्याशा रॉकेलवर भागवायचे कसे?’ असा संतप्त सवाल करत शासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबतचे सविस्तर वृत्त लोकमतने २१ रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. अखेर ग्राहकांच्या नाराजीपुढे नमते घेत शासनाने फेब्रुवारीमधील रॉकेलच्या साठ्यात १० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे आता महिन्याला किमान ४०० मिलिलीटर रॉकेल पदरात पडणार आहे. जिल्ह्यात श्वेत शिधापत्रिकाधारक वगळून ३ लाख ७५ हजार ८५४ नागरिकांना रॉकेल वितरीत केले जाते. डिसेंबर २०१४ पर्यंत शहरी भागात महिन्याला प्रति माणसी २ लीटर आणि प्रतिशिधापत्रिका जास्तीत २० लीटर रॉकेल, तर ग्रामीण भागात महिन्याला प्रति माणसी २ लीटर आणि प्रतिशिधापत्रिका जास्तीत १५ लीटर रॉकेल वितरीत करण्याच्या शासनाच्या सुचना होत्या. प्रत्यक्षात जिल्ह्याची रॉकेलची एकूण मागणी २८३० किलोलीटर इतकी होती. मात्र, या मागणीच्या ३७ टक्केच म्हणजे १०६८ किलोलीटर इतकेच रॉकेल जिल्ह्यासाठी पाठविले जात होते.त्यातच आता जानेवारी ते मार्च २०१५ या तीन महिन्यासाठी केवळ ६४८ किलोलीटर (२३ टक्के) इतकाच रॉकेल कोटा मंजूर झाला. त्यातच जानेवारीचा रॉकेलचा कोटा उशिरा आल्याने पुरवठा विभागाने डिसेंबरच्या कोट्यातील ६० टक्के रॉकेलचे वितरण आधीच केले. त्यामुळे आता जानेवारी महिन्यातील रॉकेलच्या वितरणात रास्त दर धान्य दुकानदारांना अडचणी आल्या. प्रति माणसी २०० मिलिलीटरप्रमाणे रॉकेलचे वितरण करावे लागले. त्यामुळे महिन्याला केवळ २०० मिलिलीटरवरच गुजराण कशी करणार, एवढेसे रॉकेल दिव्याला तरी पुरेल का, असा सवाल करत शासनाला केला. जनतेची नाराजी काही अंशी दूर करण्यासाठी फेब्रुवारीसाठी रॉकेलचा १० टक्के कोटा वाढवून आला आहे. त्यामुळे ६४८ किलोलीटर ऐवजी आता मागणीच्या ३३ टक्के म्हणजे ९३६ किलोलीटर इतका साठा जिल्हा पुरवठा शाखेला प्राप्त झाला आहे. २०० मिलीलीटरऐवजी आता किमान ४०० मिलीलीटर रॉकेल पदरात पडणार असल्याने काही अंशी ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.(प्रतिनिधी)
अखेर रॉकेलच्या कोट्यात १० टक्के वाढ
By admin | Published: February 06, 2015 11:01 PM