रत्नागिरी : करंजारी (ता. संगमेश्वर) येथे मंगळवारी विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुमारे ११ तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात रत्नागिरी वन विभागाला अखेर यश आले.करंजारी (ता. संगमेश्वर) येथे मुख्य रस्त्यालगत असलेल्या विलास तुळशीराम बेर्डे यांच्या विहिरीत भक्ष्याचा पाठलाग करीत आलेला बिबट्या विहिरीत पडला. बेर्डे यांच्या कुत्र्यामुळे विहिरीत काही तरी पडल्याचे लक्षात आले. बेर्डे यांनी जवळ जाऊन बघितले असता, बिबट्या पडल्याचे दिसले. त्यांनी संगमेश्वरचे वनपाल तौफिक मुल्ला यांना याबाबत माहिती दिली. तातडीने वनविभागाची रेस्कू टीम करंजारीत दाखल झाली.विलास बेर्डे यांच्या घरासमोर सुमारे ४० फूट खोल, गोलाई १४ फूट व चिरेबंदी आणि कठडा ४ फूट असलेल्या या विहिरीत हा बिबट्या पाण्याच्या वरच्या बाजूला कपारीत बसला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीत पिंजरा सोडला. दुपारी १२ वाजेपर्यंत बिबट्या पिंजऱ्यात न आल्याने पिंजऱ्यामध्ये भक्ष्य ठेवून पुन्हा विहिरीत सोडण्यात आला. परंतु सायंकाळी ५ वाजेपर्यंत बिबट्या पिंजऱ्यात आला नाही. अखेर टँकरच्या सहाय्याने विहिरीत पाणी सोडून पाण्याची पातळी वाढविण्यात आली. अखेर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात सुरक्षित आला, आणि उपस्थित वनविभागाच्या पथकाने आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.हा नर जातीचा बिबट्या साधारणत: चार वर्षाचाआहे. संगमेश्वरचे पशुसंवर्धन अधिकारी आनंद कदम यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेतली असता बिबट्या सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रत्नागिरीचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.या सुरक्षित बचाव मोहिमेसाठी रत्नागिरीचे वन क्षेत्रपाल प्रकाश सुतार, संगमेश्वरचे वनपाल तौफिक मुल्ला, पालीचे वनपाल एन. एस. गावडे,दाभोळेचे वनरक्षक अरुण माळी, फुणगुसचे वनरक्षक राजाराम पाटील, साखरप्याचे वनरक्षक सहयोग कराडे, रत्नागिरीचे वनरक्षक प्रभू साबणे, तपासणी नाकार साखरपा वनरक्षक सुरज तेली, करंजारीच्या पोलीस पाटील समीक्षा शेणवी, साखरप्याचे उपसरपंच ओंकार कोलते, नाणिजचे माजी सरपंच गौरव संसारे, पत्रकार राजन बोडेकर, यश कोळवणकर, निरंजन हेगिष्टे , अनिकेत मोरे, अरबाज वाडकर , जितेंद्र गजबार, दिलीप साबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
..अखेर ११ तासानंतर बिबट्याची विहीरीतून सुटका, रत्नागिरी वनविभागाच्या पथकाची यशस्वी कामगिरी
By शोभना कांबळे | Published: February 07, 2024 4:53 PM