लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : तालुक्यातील आंजर्ले मार्गे केळशी बस गेली अनेक दिवस बंद होती़; मात्र आंजर्ले ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश महाडिक यांनी केलेल्या उपाेषणाला अखेर यश आले असून, २५ जूनपासून आंजर्ले मार्गे केळशी बस सुरू करण्यात आली आहे़
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात आंजर्ले-केळशी मार्गावर आंजर्ले पाडले हद्दीदरम्यान समुद्राच्या बाजूने रस्ता खचला. त्यामुळे त्या मार्गावर छोट्या गाड्यांची वाहतूक सुरू राहिली़;मात्र बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली हाेती. त्यामुळे दापोली आगारातून केळशीला आंजर्ले पाडले मार्गे जाणाऱ्या गाड्यांची सेवा बंद करण्यात आली हाेती. या गाड्या बोरथळ लोणवडीमार्गे वळविण्यात आल्या हाेत्या. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दापाेली किंवा केळशीला जाणे त्रासाचे बनले हाेते़ अखेर आंजर्ले उपसरपंच मंगेश महाडिक यांनी येथील रस्ता दुरुस्तीसाठी बांधकाम खात्याकडे वारंवार पाठपुरावा सुरू केला. तसेच दापोली आगारामध्येही आंजर्लेमार्गे सेवा सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला. तरीही योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचे लक्षात आल्याने अखेर त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. त्यानंतर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी तातडीने उपोषणस्थळी येऊन लवकरात लवकर बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर मंगेश महाडिक यांनी उपोषण स्थगित केले होते.
आंजर्ले येथे गाडीला हार घालून चालक, वाहक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी आंजर्ले सरपंच स्वप्नाली पालशेतकर, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश केळसकर, मेघना पवार, स्वरूपा राळे, संदीप राहाटवळ, आशिष रहाटवळ तसेच दीपक आरेकर, मोहन विद्वांस, भालचंद्र केळसकर, विजय महाडिक, आंजर्ले राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर राळे, स्वप्नील विद्वांस, संदीप सरनोबत, दीपक तांबूटकर, चिन्मय काणे, नीलेश आंजर्लेकर, मंदार कोरडे, सुभाष भाटकर, विश्वास महाडिक, मंदार साळवी व ग्रामस्थ उपस्थित होते. ही गाडी सुरू करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या दापोली तहसीलदार वैशाली पाटील,पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, आगर प्रमुख मृदुला जाधव यांचे मंगेश महाडिक यांनी आभार मानले़