अधिवेशनाचे दाेन दिवस गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनीच गाजवले. अधिवेशन काळात विराेधी पक्ष ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण या मुद्यावरून सरकारला काेंडीत पकडणार, हे निश्चितच हाेते. अभ्यासू विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारला ‘गुगली’ टाकून त्यांना सभागृहातच पायचीत करणार, याची जाणीव साऱ्यांनाच हाेती. त्यामुळे विराेधी पक्षाला सामाेरे जाण्यासाठी आणि कठाेर निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या नेत्याची गरज हाेती. अधिवेशनात काय हाेणार, याची कल्पना असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांच्या नावाला पसंती दिली. सध्या तरी त्यांच्याइतका आक्रमक नेता तिन्ही पक्षांमध्ये नाही. (काँग्रेसने कितीही सांगितले तरी काेणीही अशी भूमिका घेतली नसती.) सरकारवर तुटून पडणाऱ्या विराेधी पक्षाला राेखण्याचे काम भास्कर जाधव यांनी केले आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासाला ते खरे ठरले. भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केले होते. जाधव यांच्या या कृतीने भाजप चांगलाच बॅकफूटवर आला. इतकेच काय या आमदारांच्या एकूणच वर्तनाने राज्यात एकच चर्चा झडली. पीठासनावरून धडाकेबाज निर्णय घेतल्याचे बक्षीस म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हे अध्यक्षपद भास्कर जाधव यांना मिळाे अगर न मिळाे मात्र, शिवसेनेत असताना आपल्या आक्रमकपणाने विराेधकांना जेरीस आणणाऱ्या भास्कर जाधव यांच्यातील शिवसैनिक पुन्हा एकदा जागा झाल्याचे दिसून आले. भास्कर जाधव यांनी आजवर अनेकांना आपल्या शिंगावर घेऊन बाजी पलटवून टाकली आहे. शिवसेनेचे प्रवक्तेपद देऊन पक्षाने त्यांची ताकद वाढवली आहे. गेल्या काही वर्षात संयमाची भूमिका घेणाऱ्या भास्कर जाधव यांनी आपल्यात आजही जुना शिवसैनिक आहे, याची जणू प्रचितीच दिली आहे. ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून बिरुदावली मिळवणाऱ्या भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून काम करताना विराेधी पक्षाच्या शिडातील हवाच काढून घेतली आहे. एकाचवेळी १२ आमदारांचे निलंबन केल्याने भाजप नेते चांगलेच अडचणीत आले आहेत. अध्यक्ष म्हणून कठाेर निर्णय घेणाऱ्या भास्कर जाधव यांच्या भूमिकेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘भाग्याेदय’ झाल्याचे दिसत आहे. खरंतर ही विराेधी पक्षासाठी धाेक्याची घंटाच म्हणावी लागेल.
- अरुण आडिवरेकर