खेड : तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यानंतरही गेल्या एक महिन्यापासून केवळ चर्चेत असलेले शासकीय कोविड केअर सेंटर अखेर लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृह इमारतीत सुरू झाले आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता तातडीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. अखेर सोमवारपासून हे केंद्र सुरू झाले असून, तेथे रुग्ण ठेवण्यासही सुरुवात करण्यात आली आहे.
खेड तालुक्यातील कळंबणी कोविड उपजिल्हा रुग्णालय आणि खेड नगरपालिका कोविड सेंटरची कोरोना रुग्णांची काळजी घेण्याची क्षमता काही दिवसांपूर्वीच संपली आहे. त्यामुळे अनेक कोरोना रुग्णांना नाइलाजाने गृह विलगीकरणात राहावे लागत आहे. उपलब्ध रुग्णालयातील बेड संख्येपेक्षा अधिक रुग्ण शहर परिसरासह ग्रामीण भागात आढळू लागल्यानंतर वाढीव ६० ते ७० कोरोनाग्रस्थ रुग्णांना ठेवायचे कोठे, असा प्रश्न निर्माण झाला होता.
कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रसंगी सुरू करण्यात आलेले लवेल येथील शासकीय कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले होते. ते शासकीय सेंटर लवकरात लवकर सुरू करण्यासाठी राजकीय पक्ष व नागरिकांकडून मागणी केली जात होती.
आमदार योगेश कदम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांना सूचना देत खेड, दापोली व मंडणगड येथे कोरोना रुग्णांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनीही शासकीय यंत्रणेला इशारा देत ही मागणी लावून धरली होती. केअर सेंटर सुरू केले नाही तर कोरोना रुग्णांना अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणून ठेवण्याचा इशारा दिला होता.
या सर्व मागण्यांची दखल घेत जिल्हा प्रशासनाने लवेल येथील घरडा इंजिनियरिंगच्या वसतिगृहाची इमारत ताब्यात घेऊन तेथे तीस खाटांचे कोविड केअर सेंटर अखेर सुरू केले आहे. त्यामुळे अनेक कोरोनाग्रस्थांची परवड आता थांबली आहे. सोमवारी उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजन शेळके यांनी लवेल कोविड केअर सेंटरला भेट दिली व तेथील तयारीची पाहणी केली. या सेंटरवर आवश्यक सर्व सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
गरज पडल्यास खाट वाढवणार
वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता लवेल येथे सुरू करण्यात आलेल्या तीस खाटांच्या कोविड केअर सेंटरची क्षमता शंभर खाटापर्यंत वाढवण्यात येऊ शकते, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिली.
....................................
खेड तालुक्यातील लवेल येथील कोविड केअर सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी संवाद साधला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजन शेळके हेही सोबत होते.