रत्नागिरी : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शुक्रवारी सायंकाळपासून पावसाने रत्नागिरीत जोर धरला आहे. शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस शनिवारी सकाळपर्यंत पडत होता. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत पहिल्या दहा दिवसात २५ टक्केच पाऊस पडला आहे.शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांनाही मान्सूनची प्रतीक्षा होती. जिल्ह्याच्या काही भागात अधे-मधे पावसाने हजेरी लावली होती. रत्नागिरीत मात्र पावसाने थोडक्यातच दर्शन दिले होते. परंतु शुक्रवारी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह रत्नागिरीत जोरदार पाऊस बरसला. सायंकाळी उशिरा सुरू झालेल्या या पावसाच्या रात्रीही मोठमोठ्या सरी कोसळल्या. शनिवारी सकाळच्या सत्रातही काही मोठ्या सरी कोसळल्या. त्यामुळे सूर्यदर्शन उशिरानेच झाले.गतवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस ठाण मांडून बसला होता. त्यामुळे ११ जूनपर्यंत ९ तालुक्यात सरासरी २१६.६७ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. यंदा पावसाचे आगमन उशिराने झाल्याने पहिल्या ११ दिवसात केवळ सरासरी ५५.३३ मिलीमीटर इतकाच पाऊस पडला आहे.
मान्सूनची प्रतीक्षा संपली! अखेर रत्नागिरीत पावसाचे आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 5:59 PM