रत्नागिरी : खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट ओढवले आहे. वाढलेले खतांचे दर परवडणारे नसल्याने ते तात्काळ कमी करावेत, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदार संघटनेद्वारे करण्यात येत आहे.
गतवर्षीपासून लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. शेतीची कामे जरी सुरू असली तरी बाजारपेठा मात्र बंद आहेत. हवामानातील बदलामुळे शेतीच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. चक्रीवादळामुळे तर यावर्षी शेवटच्या टप्प्यातील आंबा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत असतानाच रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने नवा प्रश्न निर्माण झाला आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला असताना, कोरोना संकटाचा सामना करत असतानाच खतांच्या किमतीमध्ये ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे दर तात्काळ कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. १२०० रुपयांमध्ये मिळणाऱ्या मिश्र (डीएपी) खताचे पोते आता १९०० रुपयांना मिळत आहे. शेतीसह बागायतीसाठी युरियापेक्षा मिश्र खतांना विशेष मागणी होत आहे. मे महिन्यातच शेतकरी खताची मागणी नोंदवितात; परंतु खताच्या भरमसाट दरवाढीमुळे खत खरेदी करावे की करू नये, असाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
खतांच्या वाढत्या किमतीमुळे पीक व्यवस्थापनाची गणिते मात्र बिघडणार आहेत. शेतीच्या खर्चात वाढ होणार आहे. हवामानातील बदलामुळे आधीच शेतीच्या उत्पन्नात घट होत आहे. त्यात खते व शेतीशी संलग्न अन्य वस्तूंनाही महागाईची झळ बसली आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे खतांच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
.........................
मिश्र खतांचे जुने व वाढलेले दर पुढीलप्रमाणे
खते जुने दर नवीन दर
१०:२६:२६ ११७५ १७७५
१०:३२:१६ ११९० १८००
२०:२०:०० ९७५ १३५०
डीएपी १८७५ १९००
डीएपी १२०० १९००
२०:२०:०० ९७५ १४००
पोटॅश ८५० १०००