रत्नागिरी : शहरातील मुख्य बाजारपेठेतील गोखलेनाका येथील तीन दुकानांना काल (शुक्रवारी) मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमाराला अचानक आग लागली. बाजारपेठेत आगीचे लोळ दिसू लागताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीत ४ दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तब्बल अडीच तासांनी ही आग विझविण्यात यश आले.रत्नागिरी बाजारपेठेतील हनुमान कोल्ड्रिंक्स, गांधी यांचे चणा सेंटर, वणजू यांचे विडी दुकान आणि कोलते यांचे कोलते पान विडी दुकान आगीत भस्मसात झाली आहेत. हनुमान कोल्ड्रिंक या दुकानात असणाऱ्या इन्व्हर्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या आगीची माहिती मिळताच रत्नागिरी नगरपरिषदेची अग्निशमन यंत्रणा, फिनोलेक्स कंपनीची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती. नागरिकांच्या मदतीने तब्बल अडीच तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात आली.पोलीस सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दळवी, रोहन लाड, आशिष पाटेकर यांनी सर्वप्रथम ही आग पाहिली. त्यांनी तत्काळ शहर पोलीस स्थानकात आगीची माहिती देताच नगरपरिषदेच्या बंबाला पाचारण करण्यात आले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने या दुकानांमधील माल बाहेर काढण्यात आला. दुकानांच्या छापरावरून ही आग पसरत गेली व ४ दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.