चिपळूण : शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील स्वच्छतागृह परिसरात गुरुवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास अचानक किरकोळ आग लागली; मात्र परिसरात धुराचे लोळ पसरल्याने एस. टी. कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन चिपळूण नगर परिषदेचा अग्निशमन बंब मागवला. त्यानंतर काही वेळातच ही आग विझवण्यात आली.
येथील आगार परिसरात असणाऱ्या स्वच्छतागृहाच्या मागील बाजूला मोठ्या प्रमाणावर झाडीझुडुपे वाढली आहेत. झुडुपांच्या वेली या स्वच्छतागृहाच्या छतावरही पोहोचल्या आहेत. याशिवाय काही प्रमाणात कचराही साचला होता. गुरुवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास अचानक स्वच्छतागृहाच्या मागील बाजूने आग पेटलेली काही प्रवासी व कर्मचाऱ्यांना दिसली, तसेच परिसरातही धूर पसरला होता. कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याची माहिती आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांना दिली. ते घटनास्थळी आल्यानंतर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत बंब पाठवण्याची विनंती केली. काही वेळातच बंब आगारात आला व कर्मचाऱ्यांनी थोड्याच वेळात ती आग विझवली.
.......
चिपळूण बसस्थानक परिसरातील आग अग्निशमन दलामार्फत विझवण्यात आली. (छाया : संदीप बांद्रे)