चिपळूण : शहर भौगोलिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होत आहे. काही प्रभागातील कौलारु घरांची जागा आता इमारतींनी घेतली आहे. मात्र, आजही काही भागात अग्नीशमन गाडी जाण्यास रस्ता नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यास ही सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते. सध्या अग्नीशमन गाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुविधांचा अभाव असल्याचे चित्र दिसत आहे. नव्याने बांधण्यात येत असलेली अग्नीशमन केंद्राची इमारत केव्हा सुरु होणार, असा सवाल जनतेमधून केला जात आहे.चिपळूण नगरपरिषद प्रशासनाचा सध्या एक अग्नीशमन बंब कार्यरत आहे. सहा महिन्यांपूर्वी शहरातील बाजारपेठेत एका दुकानाला आग लागली. यावेळी लोटे, खेड, पोफळी येथून अग्नीशमन गाड्यांची मदत घ्यावी लागली. आगीच्या घटना या अधूनमधून घडतच असतात. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने नवीन गाडी खरेदी करण्याचा ठराव मंजूर केला आहे.शहरात अग्नीशमन केंद्राची स्वतंत्र एखादी इमारत असावी. या उद्देशाने रामतीर्थ परिसरात इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, ही इमारत अद्याप कार्यान्वित झालेली नाही. इमारत परिसरात पाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत. सध्या अग्नीशमन गाडीवर काम करणारे कर्मचारी हे नगर परिषद इमारतीच्या खाली असणाऱ्या भागात बसत असून, त्यांना बसण्यासाठी स्वतंत्र खोली नाही. खुर्च्याही तुटलेल्या आहेत. जवळच जनावरांचा कोंडवाडा असून, तो सध्या रिकामाच आहे. या कोंडवाड्याची साफसफाई करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने रात्रीच्या वेळी डासांचा सामना येथील कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या कथा मांडल्या, तर त्यांना केवळ आश्वास देऊन वेळ मारुन नेली जात आहे. डास चावल्याने गंभीर आजार होतात. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासन करीत असले तरी ‘दिव्या खाली अंधार’ अशी स्थिती आहे. कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक त्या सेवा सुविधा मिळाल्यास ही सेवा त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने देण्यास उभारी मिळेल. सत्ताधारी व प्रशासनाने त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चिपळूण नगरपरिषद या विभागातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा कधी मिळमार असा प्रश्न विचारला जात आहे.(वार्ताहर)
अग्नीशमन इमारत मुहूर्ताविना पडून
By admin | Published: November 03, 2014 9:53 PM