सुनील आंब्रे -आवाशी (खेड) : मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रिवी ऑर्गेनिक कंपनीचे गोडावून रविवारी पहाटे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. कंपनीला लागणारा कच्चा माल या गोडावूनमध्ये ठेवण्यात आला आहे. या कंपनीचा मुख्य प्लांट आणि अशोका गॅसचा प्लांट जवळच असल्याने अजूनही भीती कायम आहे.
रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. कंपनीच्या कामात लागणारे विविध प्रकारच्या सॉल्वंटची या गोडावूनमध्ये साठवणूक करण्यात आली आहे. सॉल्वंट अत्यंत ज्वालाग्रही असल्याने, ही आग झपाट्याने वाढली. एमआयडीसीच्या दोन अग्निशमन बंबांसह चिपळूण व खेड नगरपालिकेचे अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र आगीने रौद्र रुप धारण केले असल्याने ती अजून आटोक्यात आलेली नाही.
आग लागली तेव्हा गोडावूनमध्ये कोणीही नव्हते. यामुळे कोणाला दुखापत झालेली नाही. मात्र मंगेश पवार नामक एका कामगाराला आगीतून पसरलेल्या वायूची बाधा झाली आहे.
या कंपनीचा मुख्य प्रकल्प आणि अशोका गॅस कंपनी, या गोडावून नजीक आहेत. जर आग आटोक्यात आली नाही तर अनर्थ ओढवण्याची भीती आहे. आत्ता आग आटोक्यात आणण्यायाठी कंपनीचे कामगार, ग्रामस्थ, अग्निशमन यंत्रणांचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.