रत्नागिरी : शॉर्टसर्किटमुळे बॉयलरने अचानक पेट घेतल्याने मोठी आग लागल्याची घटना आज, गुरुवारी नजीकच्या भाट्ये येथील कोहिनूर हॉटेलमध्ये घडली. कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने प्राणहानी टळली असली, तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली. प्राथमिक अंदाजानुसार आगीमध्ये हॉटेलचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. कोहिनूर हॉटेलच्या स्लॅबच्या वरील बाजूला शॉर्टसर्किट झाल्याचा अंदाज आहे. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास स्लॅबवरून धूर येत असल्याचे हॉटेलमधील कर्मचारी जितेंद्र साळवी आणि वॉचमन शिंदे यांनी पाहिले. त्यानंतर त्या दोघांनीही आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने इतर कर्मचारीही सावध झाले. हॉटेलला आग लागल्याचे समजताच काही कर्मचाऱ्यांनी हॉटेलमध्ये गाढ झोपेत असलेल्या पर्यटकांना तत्काळ उठविले. पर्यटक आणि त्यांचे कुटुंबीय असे एकूण सुमारे १२ लोक हॉटेलमध्ये मुक्कामाला आले होते. कर्मचाऱ्यांनी प्रथम पर्यटकांना हॉटेलमधून बाहेर काढले. स्फोट होऊ नये म्हणून या कर्मचाऱ्यांनी हॉटेलमधील तीन गॅस सिलिंडर उचलून बाहेर आणले.
भाट्येत कोहिनूर हॉटेलला आग; पाच लाखाचे नुकसान
By admin | Published: December 19, 2014 12:06 AM