चिपळूण : शहरातील बहाद्दूरशेख नाका येथील दोन दुकान गाळ्यांना काल, बुधवारी रात्री ९.३० च्या दरम्यान आग लागून दोन्ही दुकानांचे २३ लाख ८६ हजार ८४५ रुपयांचे नुकसान झाले.काल रात्री बहाद्दूरशेख नाका परिसरातील वर्दळ कमी झाल्यानंतर संजय जाधव यांचे स्वामी मेन्स ब्युटी सलून हे दुकान सुरू होते. दरम्यान, त्यांच्या मागच्या बाजूच्या संदेश गोरीवले (वालोपे) यांच्या बंद असलेल्या श्री मशीन्स टुल्स या दुकानाला आग लागली. गाळा बंद असल्याने आतल्या आत सामान पेटत गेले व धूर बाहेर येऊ लागला. आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर आग स्वामी मेन्सच्या दिशेने सरकली. यावेळी काच तापल्याने फुटून उडू लागली व धूर बाहेर येऊ लागल्यामुळे संजय जाधव यांनी धावाधाव केली. त्यांनी तातडीने आसपासच्या नागरिकांना बोलाविले आणि नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. स्थानिक नागरिक व नगरपालिकेच्या बंबाने आग आटोक्यात आणली. मात्र, श्री मशीन्स टुल्समधील सर्व सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या दुकानाचे एकूण २१ लाख ९८ हजार १४५ रुपयांचे नुकसान झाले, तर स्वामी मेन्स ब्युटी सलूनचे १ लाख ८८ हजार ७०० रुपयांचे नुकसान झाले. सहायक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव, प्रभाकर मोरे, हवालदार शांताराम सापते, आर. के. शिंदे, इम्रान शेख यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणण्यास मदत केली व पंचनामा केला. आज, गुरुवारी अनेक ग्रामस्थांनी, मान्यवर पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दसपटी नाभिक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र राऊत, जिल्हाध्यक्ष महादेव चव्हाण, चंद्रकांत राऊत व अन्य समाजबांधवांनी संजय जाधव यांना भेटून नाभिक समाजातर्फे आर्थिक मदत केली. या आगीचा पंचनामा मंडल अधिकारी यु. एल. जाधव व तलाठी ए. एन. कुंभार यांनी केला. (प्रतिनिधी)
दोन दुकानांना आग; २४ लाखांचे नुकसान
By admin | Published: November 20, 2014 11:59 PM