आवाशी : लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीतील जुनी श्रेयस व आता केसर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रासायनिक कंपनीत रविवारी दुपारी २ वाजता लागलेल्या आगीत कंपनीतील कच्च्या मालासह तयार माल, पत्राशेड व अन्य सामुग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली.दुपारी एक ते दोन या जेवणाच्या वेळेत अनेक कामगार जेवणासाठी प्लँटच्या बाहेर होते. मात्र, याचवेळी सीपीसी या प्लँटमध्ये वेल्डिंगचे काम सुरु असताना पडलेल्या ठिणगीमुळे शेजारील रिअॅक्टरने पेट घेतला व आग आजूबाजूच्या परिसरात पसरु लागली. तत्काळ शेजारील एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले. मात्र, त्यांनाही यायला उशीर झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. याचवेळी जेथे आग लागली तेथे दहा ते बारा कामगार काम करत होते, तर एकूण पहिली पाळी व साधारण शिफ्टमध्ये दोनशेहून अधिक कामगार काम करत होते. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.लोटे एमआयडीसी अग्निशमन दलाची दोन वाहने, एक खासगी टँकर, चिपळूण - खेड नगरपालिकांचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. यात सर्वात स्थानिक तरुणांची मदतकार्यात महत्त्वाची भूमिका होती. यामध्ये लोटे शाखाप्रमुख सचिन काते, चेतन वारणकर, संतोष कदम, गुणदेचे उपसरपंच तुकाराम बावदाणे, रुपेश काते, अनिल साळवी, प्रल्हाद सावंत, नंदू काते, प्रमोद आंब्रे, संतोष खरात, महेश देवरुखकर, सुरेश आखाडे, राजेंद्र बावदाणे, गोविंद खरात, विजय कदम, प्रशांत खानापुरे, ज्ञानेश्वर गोटल, समीर कालेकर, मनोज कालेकर, प्रथमेश जाधव यांनी जीवाची बाजी लावून आग विझविण्यात येणाºया ड्रमचा अडथळा, स्क्रॅप मटेरियल व अन्य सामान बाजूला करुन अग्निशमन दलाला मदत केली. घटनास्थळी घरडा कंपनीचे प्रकल्प प्रमुख आर. सी. कुलकर्णी, कृष्णा कंपनीचे व्यवस्थापक एस. एम. पाटील, नागानंदा, आवाशीचे सतीश आंब्रे यांनी मदत कार्यात पुढाकार घेतला. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.एमआयडीसीचे अग्निशमन दल कुचकामीलोटे - परशुराम, ता. खेड, औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाकडे दोन अग्निशमन बंब आहेत. मात्र, मागच्या केन केमिकलच्या आगीवेळी जसे वाहनात पाणी नसल्याने केन कंपनीची आग विझविण्यात झालेला उशीर नुकसानास कारणीभूत ठरला. तसाच आजचा प्रसंगही होता. कारण दोन वाहने एकाचवेळी कंपनीत आली. मात्र, दुसरे वाहन आगीस्थानी येऊन ते कार्यरत होण्यास अडथळा येत होता. जवळपास अर्धा तास ते वाहन कार्यरतच होत नव्हते. त्यामुळे आग विझविण्यास उशीर झाला.
लोटेच्या ‘श्रेयस’ कंपनीत आगीचे तांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:51 PM