चिपळूण : मार्च महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यातून पहिला अर्ज कादवड ग्रामपंचायतीकडून तहसील कार्यालयाकडे दाखल झाला आहे. गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटत चालल्याने, एप्रिल महिन्यापासून गावात टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी या अर्जात ग्रामपंचायतीने करण्यात आली आहे.
तालुक्यातील दसपटी विभागात दरवर्षी पाण्याचा प्रश्न भेडसावतो. अनेक पाणीयोजना राबवूनही पाण्याचा प्रश्न मात्र मिटत नाही. तालुक्यात दरवर्षी चार ते साडेचार हजार मिलिमीटर पाऊस कोसळतो. अतिवृष्टीमुळे पूर समस्येचा वारंवार सामना कराव्या लागलेल्या या तालुक्यात उन्हाळ्यात मात्र पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या कायम आहे.
या वर्षी मार्च महिन्यातच कादवड ग्रामपंचायतीने टँकरसाठी येथील तहसील कार्यालयाला मागणी पत्र पाठविले आहे.
सद्यस्थितीत गावातील पाणीसाठे आटत चालले आहेत. जेमतेम पुढील १५ दिवस असलेल्या पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. मात्र, पुढील काळ कठीण असल्याने, गावात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी विनंती प्रशासनाला केली आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचे नियोजन सुरू झाले आहे.