खेड : उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्यामुळे नैसर्गिक जलस्रोतात घट झाली आहे. तालुक्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहिले असून, प्रशासनाला लवकरच टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. गतवर्षीपेक्षा १५ दिवस उशिरा पाणीपुरवठा करण्यासाठी टंचाईग्रस्त आंबवली-भिंगारा ग्रामस्थांचा अर्ज येथील पंचायत
समितीला प्राप्त झाला आहे.
दरवर्षी तीव्र पाणीटंचाईमुळे तालुक्यातील दुर्गम वाडी, वस्त्यांमधून टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात अर्ज दाखल केले जातात.
यावर्षी आंबवली-भिंगारा येथे पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेत सोमवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे यंदा पहिला टँकर आंबवली-भिंगारा येथे धावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गतवर्षी चिंचवली-ढेबेवाडी व आंबवली-भिंगारा येथील वाड्यांमध्ये पहिला टँकर धावला हाेता. यंदाही आंबवली-भिंगारा येथे निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे याच ठिकाणाहून पाण्याचा पहिला टँकर धावण्याची शक्यता आहे. यावर्षी ६३ गावे २०२ वाड्यांचा संभाव्य टंचाई कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. आराखड्यात दापोली मतदारसंघातील ४० गावे व १७७ वाड्या, तर गुहागर मतदारसंघातील २३ गावे ५५ वाड्यांचा समावेश आहे. यातील ५० गावे ७० वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.