आबलोली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने गृह अलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य केले आहे. तसेच दोन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात यावेत, असे शासनातर्फे सांगण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद देत गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतीने तयार केलेल्या तालुक्यातील पहिल्या कोविड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन सभापती पूर्वी निमुणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकशिक्षण मंडळ, आबलोलीच्या खोडदे-गोणबरेवाडी येथील शैक्षणिक संकुलात १० बेडचा हा विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला असून, याठिकाणी स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र खोल्या असल्याचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन चंद्रकांत बाईत यांनी सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जी. पी. जांगीड व प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एच. गावंड यांनी बेड उपलब्ध करून दिले आहेत. तसेच आवश्यक आरोग्य सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोलीतर्फे पुरविण्यात येणार आहेत.
यावेळी सभापती पूर्वी निमुणकर, लोकशिक्षण मंडळ, आबलोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बाईत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जी. पी. जांगीड, वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एच. गावंड, सरपंच तुकाराम पागडे, ग्रामसेवक बी. बी. सूर्यवंशी, तलाठी आनंद काजरोळकर, पोलीसपाटील महेश भाटकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमेय आर्यमाने, आशिष भोसले, पूजा कारेकर, मीनल कदम, मुग्धा पागडे, राजेंद्र कारेकर, अमोल पवार, संदेश कदम, कर्मचारी योगेश भोसले, प्रकाश बोडेकर, शंकर घाणेकर उपस्थित होते. ग्रामसेवक बी. बी. सूर्यवंशी यांनी आभार मानले.
----------------
गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतीने पहिला कोविड विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा मान मिळवला आहे. यामुळे गावातील रुग्णांवर गावातच प्राथमिक उपचार होणार आहेत. आमचे गाव कोरोनामुक्त गाव करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या विलगीकरण कक्षाचा लाभ गावातील रुग्णांना होणार आहे.
- तुकाराम पागडे, सरपंच, आबलोली