रत्नागिरी : श्रावण महिना म्हटला की, व्रतवैकल्यांचा पवित्र महिना. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंभू महादेवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आणि सर्व मंदिर बंद ठेवण्यात आली. त्यामुळे श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांना शंभू महादेवाचे दर्शन दुरुनच घ्यावे लागले.रत्नागिरी जिल्ह्यातील मंदिरांमध्ये श्रावण महिन्यात नामसप्ताह, कीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. रत्नागिरी शहरातील श्रीदेव भैरी, स्वयंभू काशीविश्वेश्वर तर श्रीदेव धूतपापेश्वर (ता. राजापूर), श्रीदेव गांधारेश्वर (ता. चिपळूण), श्रीदेव व्याडेश्वर (ता. गुहागर), श्रीदेव मार्लेश्वर व कसबा येथील कर्णेश्वर मंदिर (ता. संगमेश्वर) याठिकाणी श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी उसळलेली असते. मात्र, यावर्षी ही मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत.चिपळुणातील गांधारेश्वर मंदिरातही भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. काही ठिकाणी मंदिराकडे जाणारे रस्तेही बंद केले आहेत. त्यामुळे भाविक मंदिराबाहेरूनच महादेवाचे दर्शन घेत आहेत. मार्लेश्वर मंदिराच्या पायथ्याशी देवस्थानने फलक लावून मंदिराकडे जाणारा मार्गच भाविकांसाठी बंद केला आहे.
रत्नागिरीतील श्रीदेव भैरी मंदिरात मोजक्याच लोकांमध्ये संततधार, पूजा, आरती, दोन माणसांमध्ये रुद्राभिषेक हे कार्यक्रम सुरू ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून मंदिरातील धार्मिक विधी सुरू ठेवण्यात आले असून, भाविकांना मात्र दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.