खेड : सूड घेणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये, अशा स्वरूपाचे वक्तव्य लिहिलेला व सदानंद कदम यांचा फोटो असलेल्या बॅनरवर कारवाई करत अज्ञात व्यक्तीविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या निवडणुकीतील हा पहिलाच गुन्हा आहे.लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर रायगड लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या खेडमध्ये एका बॅनरवरून राजकारण तापले आहे. शहरातील अनिकेत शॉपिंग सेंटरच्या परिसरात रंगपंचमीच्या रात्री लावलेल्या एका बॅनरप्रकरणी सोमवारी रात्री खेड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीकडेच त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एका अज्ञात व्यक्तीने सदानंद कदम यांचा फोटो बॅनरवर वापरून ‘सूड घेणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये,’ असा फलक नगरपालिकेची परवानगी न घेता लावला होता.ही बाब निदर्शनास आल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी हा बॅनर तत्काळ हटवला. मात्र, विनापरवाना लावण्यात आलेल्या या बॅनरप्रकरणी नगरपालिका अभियंता प्रणव सस्ते यांनी खेड पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५ चे कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.