आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे रेल्वेस्थानक व्हावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्यात आला. या लढ्यातून येथे रेल्वेस्थानक उभे राहिले. मात्र, कोरोनाकाळात पॅसेंजर बंद असल्याने या स्थानकावर प्रत्यक्षात पॅसेंजर थांबण्याचे येथील जनतेचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते. अखेर मंगळवार, दिनांक ७ सप्टेंबर रोजी या स्थानकावर पहिली पॅसेंजर थांबणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. ऐन गणपती हंगामात येथील जनतेला यामुळे दिलासा मिळाला आहे.
कडवई येथे रेल्वेस्थानक व्हावे, या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील जनतेच्या सहभागातून लढा उभारण्यात आला. या लढ्यात मनसेच्या ६५ कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. सुरुवातीच्या काळात मनसेने यासाठी एकाकी लढा दिला व स्थानकाला अंतिम मंजुरी मिळवली. मात्र, राजकीय श्रेयाच्या चढाओढीत या कामाला गती मिळत नव्हती. त्यानंतर राजकीय दबाव झुगारत येथील जनतेने लढ्यात सहभाग घेतला, तर अंतिम टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिक्षा मालक-चालक संघटना यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक संघटना, राजकीय व्यक्ती, प्रतिष्ठित नागरिक यांनी लढ्यात सहभाग घेतला. शिवसेनेच्या काही सरपंच, उपसरपंच यांनीही या लढ्यात मनसेला साथ दिली.
या जनआंदोलनाची दखल रेल्वे प्रशासनाला घ्यावी लागली आणि अखेर या स्थानकाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला. दोन वर्षात स्थानकाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मात्र, कोरोना काळात पॅसेंजर सेवा पूर्णपणे बंद असल्याने या स्थानकावर गाडी थांबत नव्हती. गणेशाेत्सवाच्या काळात दिवा - सावंतवाडी पॅसेंजर सुरू करण्यात येत असल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली. त्यामुळे स्थानक उभे राहिल्यापासून पहिली पॅसेंजर या स्थानकावर थांबणार आहे.
------------------------------
हा लढा येथील जनतेच्या पाठिंब्यामुळे यशस्वी झाला आहे. राजकारण करण्यापेक्षा येथील लोकप्रतिनिधींनीनी या स्थानकाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आपण सदैव त्यांच्या सोबत असू. आमदार शेखर निकम यांनी येथील समस्यांबाबत कोकण रेल्वेचे विभागीय संचालक संजय गुप्ता यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा केला, ही बाब समाधानाची आहे.
- जितेंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष, मनसे.