लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : अकरावी प्रवेश प्रक्रियेचे कामकाज सुरू असून प्रवेशाची पहिली निवड यादी जाहीर झाली आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता निवड यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीतील विद्यार्थ्यांना दि. २८ ऑगस्ट ते दि. १ सप्टेंबरपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत २१ हजार ८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. निकाल १०० टक्के लागला आहे. जिल्ह्यातील १४१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २७ हजार ४२० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊनही ६३४० जागा शिल्लक राहणार आहेत.
जिल्ह्यात अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ६१, विनाअनुदानित ५१, स्वयंअर्थसाहाय्यित २९ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतून कला शाखेची एकूण ७३६०, विज्ञान शाखेसाठी ७६८०, वाणिज्य ८३६०, संयुक्त ४०२० इतकी प्रवेश क्षमता आहे. विज्ञान शाखेकडे सर्वाधिक विद्यार्थ्यांचा ओढा असल्याने प्रवेशाची यादी वाढते. शहरातील वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पालकांचा, विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्यामुळे विज्ञान शाखेकडील प्रवेश तेवढा अवघड आहे. सीईटी रद्द झाल्याने शहरातील महाविद्यालयांत ऑनलाईन व ग्रामीण भागात ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
दि. २ सप्टेंबर रोजी प्रवेश शिल्लक असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहे. दि. ४ सप्टेंबर व दि. ६ सप्टेंबर रोजी दोन दिवस दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश शिल्लक असतील; तर मूळ कागदपत्राच्या आधारे प्रवेश देऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. दि. ७ सप्टेंबरपासून कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याबाबत शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.