चिपळूण : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना म्युकरमायकोसिसचा संशयित रुग्ण आढळला आहे. कामथे उपजिल्हा रुग्णालयात तो उपचार घेत असून, लवकरच त्याची एमआरआय टेस्ट घेऊन म्युकरमायकोसिसची चाचणी होणार आहे. चिपळूण येथे आढळलेला जिल्ह्यातील हा पहिलाच रुग्ण आहे़ म्युकरमायकाेसिसचा रुग्ण आढळताच आराेग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे़
तालुक्यात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही. दररोज ७० ते ८० रुग्ण सापडत आहेत. अनेकांचा कोरोनाने जीव गेला आहे. राज्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका संभावत आहे. तालुक्यातील नायशी येथे अशाप्रकारचा संशयित रुग्ण आढळला आहे. त्याच्यावर कामथे येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. शुक्रवारी त्याची एमआरआय टेस्ट होणार असून, त्यानंतरच म्युकरमायकोसिसचे निदान होणार आहे.
सध्या तालुक्यात सध्या १०२६ अॅक्टिव्ह रुग्ण असून, त्यापैकी ७६१ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत ७ हजार ७३२ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी ६ हजार ३६९ जणांनी कोरोनावर मात केली आहे तर दुर्दैवाने २८२ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला.