राजापूर : दिवसागणिक उन्हाळ्याच्या झळा अधिक तीव्र होत असतानाच पाणीटंचाईच्या झळा पोहोचलेल्या व टॅंकरची मागणी केलेल्या तालुक्यातील मोसम सरवणकरवाडीसाठी गेल्या मंगळवारपासून (२७ एप्रिल) टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यावर्षी तालुक्यात पहिला टॅंकर धावू लागला आहे.
एप्रिल महिन्यात तीव्र उन्हाळा जाणवू लागल्याने तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागेल अशी शक्यता होती. त्यानुसार तालुक्यातील मोसम, सरवणकरवाडीतील सात ते आठ घरांना पाण्याची टंचाई भासू लागली होती. त्यानुसार प्रशासनाकडे टॅंकरची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राजापूर तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी मोसम, सरवणकरवाडीत जाऊन तेथील टंचाईग्रस्त भागाची संयुक्त पाहणी केली होती. त्यानंतर मंगळवार दिनांक २७ एप्रिलपासून मोसम, सरवणकरवाडीतील त्या सात घरांसाठी पाण्याचा टॅंकर धावू लागला आहे. त्यामुळे त्या गावातील जनतेला पाणी मिळू लागले आहे.
दिवसागणिक तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. तालुक्यात आणखी किती गावे व वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा पोहाेचून टॅंकरची मागणी होते, ते पुढील काही दिवसांत दिसणार आहे.