अरुण आडिवरेकररत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच समाजकल्याण विभागाची सभा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगावी आंबडवे (ता. मंडणगड) येथे घेण्यात आली. या सभेत आंबडवे येथील ग्रामस्थांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यात आले. प्रथमच या गावात ही सभा घेण्यात आल्याने ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले.
समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्या संकल्पनेतून ही सभा आंबडवे (ता. मंडणगड) येथे घेण्यात आली. जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून समाजकल्याण विभागाची सभा आंबडवे येथे घेण्यात आलेली नाही. आंबडवे या पवित्रस्थळी देशभरातूनच नवे तर देशाबाहेरीलही मंडळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येतात. त्यांना होणाऱ्या गैरसोयीबाबत येथील ग्रामस्थांनी कदम यांच्याशी चर्चा केली होती. त्याअनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली. या सभेला समिती सदस्य माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर, माजी बांधकाम सभापती विनोद झगडे यांच्यासह पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, सर्व सदस्य उपस्थित हाेते.
समाजकल्याण समिती असूनही या समितीची आजवर आंबडवे येथे सभा झालेली नाही. ज्या बाबासाहेबांमुळे आपल्याला समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांचे मूळगाव आपल्या जिल्ह्यात असूनही जिल्हा परिषदेच्या इतिहासात सभा झालेली नाही. त्यामुळेच ही सभा तेथे घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. - परशुराम कदम, सभापती, समाजकल्याण समिती.