रत्नागिरी, दि. 21 - पेलीकॅनिडी कुळातील ठिपकेदार चोचीचा झोळीवाला (spot-billed-pelican) या पक्ष्याचे दर्शन कोकण किनारपट्टीवर झाले आहे. तालुक्यातील गावखडी पूर्णगड समुद्रकिना-यावर हा पक्षी सापडला आहे. पूर्व किनारपट्टीवर आढळणारा हा पक्षी कोकण किनारपट्टीवर आढळल्याची पहिलीच नोंद झाली आहे. ‘निसर्ग यात्री’चे सदस्य, सर्पमित्र प्रदीप डिंंगणकर यांना हा पक्षी प्रथम आढळून आला.पिवश्या ठोक, पांढरा भुजा, जलसिंह, श्वेत महाप्लव या प्रकारच्या विविध नावांनी चोचीचा झोळीवाला ओळखला जातो. साधारणत: गिधाडापेक्षा मोठा, करड्या भु-या पांढ-या रंगाचा हा पक्षी आहे. १५२ सेंटीमीटर आकाराचा हा पक्षी असून, मोठी चपटी चोच या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे. चोचीखाली नारिंगी रंगाची पिशवी आढळून येते. पिशवीवरूनच या पक्ष्याची चटकन ओळख होते, हे एक आणखी वैशिष्ट्य म्हणावे लागेल. एकट्याने नाही तर समुहाने हा पक्षी राहतो. समुद्रकिनारी किंवा पाणथळ जागेच्या आसपास आजूबाजूच्या झाडावर वस्ती करतो. घरटे बांधून त्यामध्ये वास्तव्य करतो. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असणारी मोठी तळी, सरोवरे, नद्या, समुद्रकिना-यावर या पक्ष्याचे वास्तव्य आढळते. पूर्व किनारपट्टीवर असणारा हा पक्षी पश्चिम किनारपट्टीवर आढळल्याने पक्षीमित्रांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पश्चिम किनारपट्टीवर मुख्यत: कोकण किनारपट्टीवर या पक्ष्यांचा वावर आढळत नाही. परंतु निसर्ग यात्रीचे सदस्य प्रदीप डिंगणकर यांना गावखडीच्या समुद्र किना-यावर हा पक्षी बुधवारी आढळला. त्यांनी तातडीने निसर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांशी संपर्क साधला. ‘निसर्ग यात्रीमधील पक्षीसदस्यांनी तातडीने गावखडी गाठली. त्यांनी समुद्रकिना-यावर जाऊन पक्ष्याची छायाचित्रे काढली.या पक्ष्याची ओळख करुन आश्चर्य व्यक्त केले. पूर्व किनारपट्टीवरील हा पक्षी चक्क पश्चिम किनारपट्टीवर शिवाय कोकण किना-यावर सापडलेल्या या पक्ष्याच्या उपस्थितीने पक्षीमित्रांसमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्ष्याबाबत अधिक अभ्यास निसर्गयात्रीची मंडळी करीत आहेत.जैवविविधता, प्राग ऐतिहासिक स्थळांचा शोध, पर्यटन अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले निसर्ग यात्रीच्या सदस्यांनी ठिपकेदार चोचीचा झोळीवाला याच्या गावखडीतील दर्शनाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहेच; शिवाय पूर्व किनारपट्टीवरील हा पक्षी आढळल्याने आनंदही व्यक्त करण्यात आला आहे. गावखडीच्या समुद्रकिना-यावर हा पक्षी आढळून आल्याने अनेक पक्षीप्रेमींनी तो पाहण्यासाठी धाव घेतली.
‘निसर्ग यात्री’चे योगदान‘निसर्ग यात्री’चे सदस्यगेली काही वर्षे कोकणातील विशेषत: राजापूर तालुक्यात निसर्गातील विविध घटकांवर काम करीत आहेत. या परिसरात सुमारे ३००पेक्षा अधिक जाती - प्रजातीतील पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या आहेत. त्यात दुर्मीळ तसेच नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या पक्ष्यांमधील प्रजातींची नोंद घेतली आहे. ठिपकेदार चोचीचा झोळीवाला (spot-billed-pelican) या पक्ष्याची कोकण किनारपट्टीवरील पहिली नोंद झाली आहे. गावखडीत निसर्ग यात्री संस्थेतर्फे ‘आॅलिव्ह रिडले’ कासव संवर्धनाचे काम केले आहे.